शहरातील दोन डॉक्टर फरार काय आहे प्रकरण घ्या जाणून

शहरातील दोन डॉक्टर फरार काय आहे प्रकरण घ्या जाणून

संभाजीनर/ प्रतिनिधी - गर्भलिंग निदान सोनोग्राफी यंत्राची अवैध विक्री प्रकरणात अजून दोन डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत. हे दोन्ही डाॅक्टर छत्रपती संभाजीनगर येथील असून क्लिनीक बंद करून डॉक्टर फरार झाले आहेत.
दरम्यान, संदीप गोरे याच्याकडील गर्भलिंग निदान सोनोग्राफी यंत्र हे डॉ. सतीश गवारे याच्याकडील असल्याची प्राथमिक माहिती असल्याने चौकशीसाठी कारागृहातील डॉ. गवारेच्या पोलिस कोठडीसाठी पोलिस प्रशासनाकडून न्यायालयामध्ये अर्ज केला आहे.

गर्भलिंग निदान सोनोग्राफी यंत्र अवैध विक्री प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत संदीप गोरे, सोमनाथ बारसे, योगेश धांडे, चिखली येथून डॉ. परमेश्वर कोल्हे, छत्रपती संभाजीनगर येथून डॉ. संतोष चव्हाण ऊर्फ राना या पाच जणांना अटक केली आहे. हे पाचही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, हे सोनोग्राफी यंत्र डॉ. सतीश गवारे याचे असल्याचे संदीप गोरे याने पोलिसांना सांगितले आहे.

त्यामुळे डॉ. गवारे आणि गोरे याची समोरासमोर चौकशी करण्यासाठी कारागृहातील डॉ. सतीश गवारे याची पोलिस कोठडी द्यावी, यासाठी पोलिसांकडून न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. पोलिस चौकशी दरम्यान हे रॅकेट जालना, छत्रपती संभाजीनगर आणि चिखली या भागात सुरू होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील अन्य दोन डॉक्टरांचा समावेश असून ते त्यांचे क्लिनिक बंद करून फरारी झाले आहेत. या दोन्ही डॉक्टरांचा पोलिस शोध घेत आहेत.

सोनोग्राफी यंत्राच्या कंपनीशी पत्रव्यवहार

सोनोग्राफी यंत्राची अवैध विक्री होत असताना जप्त केलेले सोनोग्राफी यंत्र कोणाच्या नावे खरेदी झाले आहे, याची माहितीसाठी सोनोग्राफी यंत्राच्या कंपनीशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार डॉ. सतीश गवारे याच्याकडे गर्भलिंग निदान करण्याचे चार सोनोग्राफी यंत्र होते. त्यापैकी एक गेवराई येथे जप्त करण्यात आले. तर दुसरे यंत्र हे आहे. परंतु, जिल्ह्यात डॉ. गवारे याच्या नावे गर्भलिंग निदान सोनोग्राफी यंत्राची खरेदी झाल्याची नोंद नाही. त्यामुळे पोलिस बीड जिल्ह्यातही त्याच्या नावे सोनोग्राफी यंत्र खरेदी झाले की नाही याची चाचपणी करत आहेत.

सोनोग्राफी यंत्र अवैध विक्री प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यामध्ये दोन डॉक्टर असून या प्रकरणात अजून दोन डॉक्टर असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन आले असून ते डॉक्टर क्लिनिक बंद करून फरारी झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच, डॉ. सतीश गवारे याची पोलिस कोठडी मिळावी, यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. जप्त केलेली सोनोग्राफी मशीन कोणाच्या नावे आहे, या माहितीसाठी कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा