पाणी आवर्तनासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी - वैजापूर व गंगापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतर्फे पाणी आवर्तनासाठी शुक्रवार (ता. ३) वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायंकाळपर्यंत मागणी मान्य न झाल्याने या मोर्चाचे रूपांतर उपोषणात करण्यात आले.
मोर्चेकऱ्यांच्या माहितीनुसार, दिवसभरात छत्रपती संभाजीनगर येथे बैठक सुरू असून निर्णय झाला की कळवतो असे उत्तर मोर्चेकऱ्यांना मिळत होते. परंतु दिवसभरात व सायंकाळपर्यंत निर्णय झाला नाही. आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत मागण्यांविषयी निर्णय न झाल्याने शेतकरी वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून होते. दुष्काळी स्थितीत नियमाप्रमाणे नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून गंगापूर, वैजापूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणे गरजेचे होते.
यासंदर्भात आधार शेतकरी जलदूत समितीतर्फे वेळोवेळी पाठपुरावा करूनही उन्हाळी पाणी आवर्तन सोडले नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. प्रचंड उन्हातही महिला व पुरुष शेतकरी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून होते.
निर्णय न झाल्याने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती पंडित शिंदे यांनी दिली. शनिवारी (ता. ४) मागणी मान्य न केल्याने उपोषण सुरूच होते. उपोषणात शिंदे यांच्यासह, सोन्याबापू शिरसाट, रामचंद्र पिल्दे, योगेश तारू, सचिन गायकवाड, मंदाताई न्हावले आदी सहभागी झाले आहेत.