वाळूज गावात शासनाच्या पेयजल योजनेअंतर्गत केलेला पाच कोटीचा फिल्टर प्लांट धूळ खात

वाळूज/ प्रतिनिधी - वाळूज गावात शासनाच्या पेयजल योजनेअंतर्गत मागील आठ-दहा वर्षापूर्वी पाच कोटीचा केलेला फिल्टर प्लांट सध्या धूळ खात पडलेला आहे. उन्हाळ्यामध्ये वाळुज गावाची पिण्याच्या पाण्या संबंधी  बिकट परिस्थिती असते.  कधीकधी येथील नळाला आठ-दहा दिवस  पाणी येत नाही. गावातील नागरिकांना पुरेसे आणि शुद्ध पाणी मिळावे, याकरिता फिल्टर प्लांट उभारण्यात आला होता. परंतु  अनेक वर्षापासून हा प्लांट बंद असल्याने नागरिकांना आशेचे गाजर मिळाले असे म्हणावे लागेल. त्यामुळे आतातरी हा फिल्टर प्लांट सुरू करा ,असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.


वाळुज गावाची लोकसंख्या वीस हजार असून या गावातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी ऐरणीवर आहे.  या अगोदरच मागील आठ-दहा वर्षांपूर्वी गावाला टेंभापुरी धरणातील पाणी फिल्टर होऊन शुद्ध स्वरूपात मिळावे याकरिता ग्रामपंचायत च्या पुढाकाराने जिल्हा परिषद कडून शासनाच्या पेयजल योजनेअंतर्गत पाच कोटीचा फिल्टर प्लांट राबवण्यात आला होता. या प्लांट मध्ये दोन मजली इमारतीचे काम करण्यात आलेले असून एक मोठा जलकुंभ ही बनवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे पाईपलाईन देखील करण्यात आलेली आहे.  तसेच विविध कामे करण्यात आलेले आहेत. परंतु आठ वर्षापासून हा जलकुंभ बंद असल्याने नागरिकांना फिल्टर प्लांटद्वारे  मिळणारे शुद्ध पाणी मिळाले नसल्याचे नागरिक रशीद खान ,भारतीय दलित पॅंथर मराठवाडा विभाग संयोजक गणेश चव्हाण, राहुल कीर्ती शाही ,सुभाष पठारे,सिद्धार्थ नरवडे, गौतम नरवडे सह आदींनी सांगितले आहे. हा बंद असलेला फिल्टर प्लांट लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी नागरीकातून होत असून भारतीय दलित पँथरच्या वतीने वाळूज ग्रामपंचायतिला निवेदन देऊन  लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी,  अन्यथा लोकशाहीच्या विविध मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा  देण्यात आला आहे.


आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा