अवैध वाळू वाहतुकीने घेतला पाच मजुरांचा बळी

अवैध वाळू वाहतुकीमुळे गाढ झोपेत असलेल्या पाच मजुरांचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना नुकताच घडली आहे. दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला.
रात्री अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मजूर झोपलेल्या पत्र्याच्या समोर वाळू रिकामी केल्याने वाळू खाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रोडवर पुलाचे काम चालू होते. या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर येथे गुत्तेदाराकडे पूल उभारणीचे काम करत होते. पत्र्याचे शेड करून सर्व मजूर पुलाजवळच राहत होते.
दरम्यान, रात्री सर्व मजूर जेवण करून झोपले होते. एकूण सात जण या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. दरम्यान, या पुलाच्या कामासाठी रात्रीला साडेतीन वाजता वाळू घेऊन एक टिप्पर आला. अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याने घाई गडबडीत अंधारामध्ये त्यांनी पत्र्याच्या शेडवरच वाळू पलटी केली. यामुळे शेडमध्ये झोपलेल्या पाच जणांचा दबून मृत्यू झाला.
गणेश काशिनाथ धनवई (वय ४० रा. गोळेगाव) भूषण गणेश धनवई (वय १६ रा. गोळेगाव) सुनील समाधान सपकाळ (वय २० रा. पद्मावती) यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, घटनास्थळी तातडीने पोलीस उपस्थित झाले. सदर टिप्पर चालक जाफराबाद तालुक्यातला असून तो रात्री घटना घडताच फरार झाला आहे. या घटनेच्या शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी मदत करून एका मुलीचे प्राण वाचवले.
बाप लेकांचा मृत्यू
सकाळी झोपेत असताना गणेश धनवई व भूषण धनवई या बापलेकांवर काळाने घाला घातला. विशेष म्हणजे, थंडी असल्याने मयतांच्या अंगावर रग होती. त्यावर रेतीच्या जोराने पत्र्याचे शेड पडले व पत्र्यावर रेती पडली, यामुळे सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये एक तेरा वर्षी मुलगीही दबली गेली होती, परंतु गावातील ग्रामस्थांसह शेजारी राहणाऱ्या मजुरांनी मदत करून मुलीचे प्राण वाचवले.
अवैध रेती, वाहतुकीचे बळी
जाफराबाद तालुक्यांमध्ये पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळेस अवैधरित्या वाळू उपसा केला जातो. या वाळूची वाहतूक सुसाट वेगाने तालुक्यासह विदर्भातील विविध भागांमध्ये होत असते. यामुळे रात्रीच्या वाळू वाहतुकीस महसूल व पोलीस प्रशासनाचे अभय मिळत असल्याने ही घटना घडली. रात्रभर तालुक्यातून वाळू वाहतुकीचे टिप्पर सुरू असतात, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.