वेल्डींगच्या गॅसचा स्फोट चार गंभीर जखमी
औरंगाबाद/प्रतिनिधी
वाळूज एमआयडीसी भागातील रांजणगाव रोडवरील एका कंपनीच्या बाहेर शनिवारी (दि. १८) दुपारी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या स्फोटमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज एमआयडीसीच्या सेक्टर एम-१२२ मधील प्रभाकर इंजिनीअरिंग कंपनी समोर दुचाकीला वेल्डींग करताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये वेल्डर व आणखी तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.वाळूज भागात अनेक ठिकाणी दुचाकीला वेल्डींग करणारे वेल्डर आपली छोटीशी दुकान रस्त्याच्या कडेला लावून बसतात. त्याचप्रमाणे रांजणगाव रस्त्यावरील प्रभाकर इंजिनीअरिंग कंपनीसमोर सुद्धा भारत गॅस वेल्डरच्या नावे असद चाऊस रा. जोगेश्वरी हा नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास वेल्डर एका दुचाकीला वेल्डींग करत होता. दरम्यान वेल्डींग सुरू असतानांच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, वेल्डरच्या शरीराचे अवयव अर्धा किलोमीटर दूरपर्यंत उडाले. तसेच परिसरातील आजूबाजूच्या वसाहतीतील घरे, दुकानांनाही हसरा बसला. तसेच ज्या ठिकाणी दुचाकीला वेल्डींग करण्याचे काम सुरू होते, त्यामागेच झाडाखाली बसून इतर कंपनीतील तीन ते चार कामगार जेवायला बसलेले होते. या स्फोटात ते कामगार जखमी झाले असून गणेश कुंडलीक सांगळे वय २० रा. रांजणगाव तसेच असद सईदबिन सेबे वय ३० रा. जोगेश्वरी शेख चांद, ३० आणि सुनिल देवरे ५१ हे राहणार रांजणगाव शे़पु हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिस उपायुक्त उज्वला वनकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी पोउपनि राजेंद्र बांगर यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पाचशे मिटर अतंरावर पडलेला वेल्डरचा तुटलेला पाय जप्त केला, पुढील तपास पोउपनि अधाने हे करीत आहेत.
आजूबाजूचा परिसर हादरला...
या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे प्रभाकर इंजिनीअरिंगच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच आजूबाजूचा परिसरही हादरला. यामुळे परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण आहे.