मुलीच्या पित्याचा ट्युशन मधील विद्यार्थ्यावर हल्ला
पालकांनी आपल्या मुला मुलींच्या बाबतीत सुरक्षितता बाळगणे किंवा सावध राहणे इथपर्यंत ठीक आहे परंतु त्यासाठी आक्रमक होऊन टोकाचा निर्णय घेणे कितपत योग्य आहे. वर्तमानपत्र व सोशल मीडियावरील रोजच्या घटना पाहून पालकांना आपल्या पाल्याच्या बाबतीत निर्णय घेणे अत्यंत कठीण बनले आहे. अशाच प्रकारे द्विधा मनस्थितीत असलेल्या एका पित्याने ट्युशन मधील एक मुलगा आपल्या मुलीशी फोनवरून बोलला म्हणून संतापाच्या भरात त्याच्यावर चाकूने सहा वार केले.
ही भयावह घटना मंगळवारी गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील ओझ इन्स्टिट्यूटमध्ये घडली. ट्यूशनमधील मुलगा आपल्या मुलीशी फोनवरून बोलतो, यामुळे मुलीच्या वडिलांनी ट्यूशनमध्ये येऊन तक्रार केली. शिक्षकांनी तक्रारीची दखल घेत मुलांचं समुदेशन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक मुलीच्या वडिलांनी मुलावर चाकुने सपासप वार केले. मुलीच्या वडिलांनी पाच सेकंदात सहा वार केले.
या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मांडीवर आणि पाठीवर खोल घाव झाले असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.