पाळीव प्राण्यासाठी घातला स्वतः चा जीव धोक्यात

पाळीव प्राण्यासाठी घातला स्वतः चा जीव धोक्यात

संभाजीनगर /प्रतिनिधी - पाळीव प्राणी हे आपल्या मालकासाठी आपल्या प्राणाची ही पर्वा करत नाहीत हे आपण अनेकदा पाहिले आहे परंतु आपल्या पाळीव प्राण्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला ही प्राण्यांप्रती असलेले प्रेम व्यक्त करणारी घटना नुकतीच घडली आहे . चिपळूण तालुक्यातील मौजे वारेली येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तोंडली-वारेली परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता. तोंडली-वारेली गावच्या सीमेवर आशीष शरद महाजन (वय ५५) या शेतकऱ्याचे घर आहे. त्यांच्याकडे जनावरे आणि पाळीव कुत्रा आहे. शनिवारी रात्री ११.३० ते १२च्या दरम्यान महाजन यांचा कुत्रा भुंकत होता. तो का भुंकतोय, हे पाहण्यासाठी महाजन घराबाहेर पडल्यानंतर त्यांना कुत्र्याच्या दिशेने येणारा बिबट्या दिसला.

महाजन यांनी कुत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर बिबट्याने महाजन यांच्यावरच हल्ला चढवला. दोघांमध्ये झटापट झाली. झटापटीत बिबट्याने महाजन यांच्या दोन्ही पायावर, उजव्या हाताला, तोंडावर आणि डोक्यावर जखमा केल्या. रक्तबंबाळ झालेल्या महाजन यांनी बिबट्याला पकडून जमिनीवर आपटले. दोघांमध्ये सुरू असलेला संघर्ष महाजन यांच्या पत्नी सुप्रिया यांनी पाहिला. सुप्रिया यांनी टोकदार भाला आणून महाजन यांना दिला. महाजन यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरलेल्या भाल्यामुळे जखमी होऊन झटापटीमध्ये बिबट्या जागीच ठार झाला.

दोघांत संघर्ष सुरू असताना सुप्रिया यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. महाजन हे गंभीर जखमी झाल्याचे पाहिले. त्यांच्यावर वहाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून डेरवण येथील रुग्णालयात दाखल केले.
विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान यांनी सहकाऱ्यांसह मृत बिबट्याची तपासणी केली. मृत बिबट्या मादी असून तिचे वय अंदाजे १.६ ते २ वर्ष असल्याचे आढळले आहे. महाजन यांच्याबरोबर झालेल्या झटापटीमध्ये बिबट्याच्या छातीवर, पायावर आणि मानेवर जखम असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याची लांबी १९० सेमी. आहे. बिबट्याच्या पंजे, नखे, मिशा व दात सुस्थितीत आहेत. बिबट्याला शवविच्छेदनासाठी पाठवले.

हिमतीला दाद दिली
रक्तबंबाळ अवस्थेत महाजन जमिनीवर पडले होते. ते मोठ्याने श्वास घेत होते. त्यांची पत्नी सुप्रिया रडत होती. परिसरातील नागरिक ही घटनास्थळी जमले होते. वहाळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी महाजन यांची तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला. तेव्हा ''मी अजिबात घाबरलेलो नाही. सुप्रिया एकदम ओके आहे, असे महाजन यांनी डॉक्टर आणि पत्नीला सांगितले. तेव्हा सर्वांनी त्यांच्या हिमतीची दाद दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा