ना-हरकत प्रमाणपत्रासाठी ३ लाखाच्या लाचेची मागणी

ना-हरकत प्रमाणपत्रासाठी ३ लाखाच्या लाचेची मागणी

संभाजीनगर /प्रतिनिधी - पेट्रोल पंप सुरू करण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपसरपंच व दोघा ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बागुल (उपसरपंच), मोबीन व सादिक (ग्रा.सदस्य) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील फिर्यादी यांचे भागीदार यांना उप महाप्रबंधक हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी खंडाळा येथे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी मंजुरी दिली. दरम्यान पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी खंडाळा ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदार यांनी खंडाळा येथील ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतू वेळोवेळी पाठपुरावा करूनही ग्रामविकास अधिकारी त्यांना प्रतिसाद देत नव्हते. यामुळे ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी खंडाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बागुल यांची २२ नोव्हेंबर रोजी भेट घेतली. 

भेटी दरम्यान 'तुम्हाला ना-हरकत प्रमाणपत्र हवे असल्यास ३ लाख रुपये द्यावे लागतील. सर्व सदस्यांची मिटिंग घेऊनच आम्ही ना-हरकत प्रमाणपत्र देत असतो. त्यासाठी आम्हाला सर्व सदस्यांना पैसे द्यावे लागतात' असे सांगितले. तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत विभागात तक्रार दिली. त्यानुसार उपसरपंच बागुल यांच्यासह दोघा ग्रामपंचायत सदस्यांविरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा