नवरा बायकोच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल
नाशिक /प्रतिनिधी - घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळ्यांच्या घरी सारखीच परिस्थिती. नवरा बायकोचे भांडण ही सामान्य बाब आहे परंतु हे भांडण कधी कधी अतिशय विकोपाला जाते आणि त्यातून अशा घटना घडतात. नाशिकमध्ये अशीच धक्कादायक घटना नवरा बायकोच्या वादातून घडली आहे.
पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणाने चालत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली. नाशिक मधील तपोवन परिसरातील कन्नमार पुलावरून त्या तरूणाने उडी घेत आयुष्य संपवले. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव चेतक पवार असे आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली.
चेतक पवारने बायकोसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. चेतकच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी देखील उड्डाण पुलावरून खाली आली आणि रडायला लागली. घटना घडल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांनी गर्दी केली होती. ज्या रिक्षात बसून चेतक पत्नी सोबत प्रवास करत होता त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासानंतर त्याला मृत घोषीत केलं. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. चेतकने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची सखोल माहिती घेण्यासाठी पोलिसांनी चेतकची पत्नी आणि कुटुंबियांना चौकशीसाठी बोलवले. त्याशिवाय ज्या रिक्षातून चेतकने उडी घेतली, त्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलवलं आहे.
चेतक आणि त्याच्या पत्नी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणं सुरू होती. वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यावेळी चेतकने पत्नीला माघारी परत येण्यासाठी धमकी दिली होती. तू घरी परत आली नाही, तर आयुष्य संपवेल, अशी धमकी चेतकने दिली होती. पत्नी घरी परतल्यानंतरही चेतक याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस घेत आहेत.