समांतरचे पाच हजार मीटर पडून तरीही नवीन पाणी मीटर खरेदी करण्याची तयारी महापालिकेचा अजब कारभार

समांतरचे पाच हजार मीटर पडून तरीही नवीन पाणी मीटर खरेदी करण्याची तयारी   महापालिकेचा अजब कारभार

औरंगाबाद/ प्रतिनिधी- मनपा प्रशासन व्यावसायिक मालमत्तांना पाण्याचे मीटर बसवण्याच्या तयारीत आहे. फेब्रुवारी  किंवा मार्च महिन्यात हे  काम सुरु होण्याची शक्यता आहे.शहरातील मालमत्तांचे व्यावसायिक आणि रहिवासी असे वर्गीकरण करण्यात आले आहे.समांतरच्या काळात हे मीटर बसवण्याचे काम सुरु करण्यात आले होते. याकरिता  मनपाकडून मान्यता घेवून पाच हजार पेक्षा अधीक मीटर खरेदी करण्यात आले होते. यातील सुमारे चार हजार ६८० मीटर सध्या मनपाकडे पडून आहे. त्यानंतरही स्मार्ट सिटीकडून नवीन मीटर खरेदी करण्याच्या हालचाली  सुरु असल्याचे  सुत्रांनी सांगितले.
शहरात अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या लाखापेक्षा अधिक आहे. त्यातही पाण्याचा भरमसाठ वापर हा व्यावसायिक मालमत्ता कडून केला जातो. परंतु त्या तुलनेत कर मात्र आकारला जात नाही.  त्यामुळे व्यावसायिक मालमत्तांना सर्व प्रथम पाण्याचे मीटर बसवण्याचा निर्णय मनपाकडून घेण्यात आला आहे. नऊ झोन मध्ये पहिल्या टप्यात पाच हजार व्यावसायिक मालमत्तांना हे मीटर बसवायचे आहेत. दरम्यान वॉटर युटीलीटीचा करार संपुष्टात आल्यानंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी मनपाने त्याकाळात खरेदी केलेले सर्व सामान ठेवून घेतलेले आहे. त्याची एनओसी देखील कंपनीने दिली आहे. त्यावेळी इट्रॉन कंपनीचे मीटर खरेदी करण्यात आले होते. या एका मीटरची किंमत साधारण पाच हजार रुपये आहे.सध्या हे मीटर असतांना देखील स्मार्टसिटीकडून नवीन मीटर खरेदी करण्याची तयारी सुरु आहे. जुने मीटर मनपाकडे आहे, याचा विसर अधिकाऱ्यांना पडला की काय ? असा सवाल आता मनपा वर्तुळात उपस्थित केला जात आहे. या जुन्या मीटरचा वापर केल्यास मनपाची सुमारे दोन कोटी रुपयांची बचत होवू शकते. असे देखिल सुत्रांनी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा