मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा शेतमालही देशभर जाणार आता विमानाने
औरंगाबाद /प्रतिनिधी- केंद्रीय नागरी विमान वाहतूक सल्लागार समितीचे खा. इम्तियाज जलील सदस्य असुन मागील आठवड्यात समितीच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतमाल (कृषी उत्पादन) कमीत कमी वेळेत देशातील विविध बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचावे याकरिता औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कृषी उडान-२.० योजनेत समावेश करण्याची मागणी करुन तसे पत्र सुध्दा दिले होते; मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय चिकलठाणा विमानतळाचा कृषी उडान-२.० योजनेत समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती केंद्रिय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कळविले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या पत्रात नमुद केले होते की, औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून उत्पादनात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील इतर बाजारपेठेत शेतमाल कमीत कमी वेळेत पोहचण्याचे साधन तसेच योग्य वाहतूक व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नाही म्हणुन त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतमालाची कमीत कमी वेळेत बाजारपेठेत हवाई मार्गाने वाहतूक करणे आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहोचला, तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यास मदत होईल.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी योजने संदर्भात सविस्तर माहिती देत खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमूद केले की, कृषी उत्पादन योजना १.० ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मार्गावर शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून अनेक मूल्यांची प्राप्ती सुधारू शकेल. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेली, कृषी उडान योजना २.० डोंगराळ भाग, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातील नाशवंत मालवाहू उत्पादनांच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित करते. या योजनेचा उद्देश सर्व कृषी उत्पादनांसाठी, विशेषत: देशाच्या ईशान्य, डोंगराळ आणि आदिवासी भागातून उद्भवलेल्या सवलतीच्या, विनाव्यत्यय आणि वेळेनुसार हवाई वाहतूक सुनिश्चित करणे हा आहे.
पहिल्या टप्प्यात डोंगराळ भाग, ईशान्येकडील आदिवासी भागांचा कृषी उडान योजना २.० मध्ये समावेश करण्यात आला आहे. तथापि, कृषी उडान योजनेत औरंगाबादसह मराठवाड्याचा समावेश करण्याच्या व्यवहार्यतेचा भविष्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालय सकारात्मक विचार करणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांना कळविले आहे.