589 पात्र निराधारांच्या संचिका मंजूर
सिल्लोड / प्रतिनिधी - महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने सिल्लोड येथे बुधवार ( दि.2 ) रोजी तहसिल कार्यालयात निराधार योजनेची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेसाठी 240 तर श्रावण बाळ योजनेसाठी 349 असे एकूण 589 पात्र संचिकांना मंजुरी देण्यात देण्यात आली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने निराधार योजनेची बैठक नियमितपणे होत असल्याने निराधारांना मोठा आधार मिळत आहे.
तहसीलदार विक्रमसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ( दि.2 ) रोजी शासकीय कमिटीच्या झालेल्या बैठकीत ऑनलाइन झालेल्या सर्व पात्र संचिका निकाली काढण्यात आल्या. यात एकून 419 संचिकांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने त्रुटी आढळून आलेल्या नागरिकांना याबाबत माहिती देण्यात येणार असून संचिकेत त्रुटी असलेल्या नागरिकांनी त्रुटींची पूर्तता करावी जेणे करून येत्या बैठकीत पात्र संचिकाना मंजुरी देता येईल असे तहसीलदार विक्रम राजपूत म्हणाले.
पात्र संचिका मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार आता दर महिन्याला 1 हजार रुपये मानधन मिळणार आहे. ज्यांच्या संचिका आवश्यक कागदपत्रे अभावी नामंजूर झाल्या आहेत त्यांनी सदरील पूर्तता करून द्यावी. यातील पात्र संचिका त्वरित निकाली काढण्यात येईल. निराधार योजनेसंबंधी लवकरच पुन्हा बैठक होणार असल्याने निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी राहिलेल्या वयोवृद्ध व निराधार नागरिकांनी त्वरित तहसील कार्यालयात संचिका दाखल कराव्यात असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.