वडगाव कोल्हाटी - बजाजनागर ग्रामपंचायत निवडणुकीत जावा - जावा समोर भाजपने घर फोडल्याची चर्चा
औरंगाबाद/प्रतिनिधी - वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मध्ये जावा जावा एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात उतरल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलने घर फोडल्याची खमंगदार चर्चा मतदारात होत आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक चार मध्ये मागासवर्गीय महिला आरक्षित वार्डात शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांच्या पॅनल कडून पुनम प्रकाश भोसले तर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनल कडून जयश्री आत्माराम भोसले या निवडणूक रिंगणात उतरल्या आहे. या दोघी सख्ख्या जावा एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात असल्याची जोरदार चर्चा मतदारांमध्ये होत आहे. ऐनवेळी भारतीय जनता पार्टी पक्षाने आमचे घर फोडून आम्हाला एकमेकांसमोर उभे केल्याची माहिती प्रकाश भोसले यांनी दिली. निवडणुकीत जर उमेदवारी अर्जात अडचण झाली तर एक डमी अर्ज असावा म्हणून प्रकाश भोसले यांनी त्यांच्या वहिनीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र परत घेण्याच्या ऐनवेळी भारतीय जनता पक्षाने आमचे घर फोडून वहिनीला पत्नी समोर उभे केल्याने आमच्या घरात मोठी अडचण झाल्याच्या भावना प्रकाश भोसले यांनी व्यक्त केल्या.
पुनम प्रकाश भोसले यांनी यापूर्वी बजाजनगर गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली असल्यामुळे त्यांच्या पाठीशी निवडणुकीचा एक मोठा अनुभव आणि त्यांचा चाहता वर्ग आहे. जर जयश्री आत्माराम भोसले यांनी उमेदवार अर्ज मागे घेतला असता तर पूनम भोसले या बिनविरोध विजय झाल्या असत्या. ही संधी साधत भारतीय जनता पक्षाने जयश्रीताई यांचा उमेदवारी अर्ज आपल्या पॅनल कडून सादर केल्यामुळे भोसले परिवारात सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. मतदार राजा यावेळी भोसले परिवारात कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.