अंगणवाडी पोषण आहारात भेसळ आहाराने मुलांच्या आरोग्याला धोका
औरंगाबाद/प्रतिनिधी - अंगनवाडी मार्फत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे प्रकल्प अधिकारी बालविकास प्रकल्प -2 गंगापूर यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज मधील भगतसिंगनगर येथील अंगणवाडी क्र 15 मधून परिसरातील गरोदरमाता तसेच 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण आहार पुरविला जातो. त्यामध्ये गहू, मुगाची डाळ, साखर, लाल तिखट पावडर, हळद, मीठ, तांदूळ आदी वस्तू पुरविल्या जातात दि 29/04/22 रोजी भगतसिंगनगर येथील पालक रतन आंबिलवादे हे त्यांच्या 2.5 वर्षाच्या अपत्याचा पोषण आहार घेऊन आले असता मुलगा खातांना सारखे माती, माती असे म्हणत केलेला आहार खाण्यास नकार दिला याबाबत शंका आल्याने रतन आंबिलवादे यांनी आहार चाखून बघितला असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचकच असल्याची जाणवली त्यानंतर त्यांनी पोषणआहारामधील मिर्ची पूड तसेच, हळदपूड तपासली असता त्यामध्ये ही कचकच आढळून आली. तसेच शेजारी ईतर लाभार्थ्यांकडील पॅकेट ची तपासणी केली असता त्यातही मोठ्या प्रमाणात कचकच असल्याचे दिसून आले त्यानंतर वाटण्यात आलेल्या सर्व आहारात कचकच असल्याचे निष्पन्न झाले.
यामुळे बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन मुतखडा सदृश आजार होऊ शकतो. त्यामुळे देण्यात येणारा आहार हा बालकांच्या पोषणासाठी आहे की कुपोषणासाठी ? असा सवाल यावेळी भाकपणे केला. सदरील प्रकरण हे अत्यंत गंभीर असून याची लवकरात लवकर चौकशी व्हावी तसेच दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका निर्मला वाघ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाकप चे वाळूज शाखेचे सचिव कॉ इब्राहिम पटेल, सहसचिव कॉ रतन अंबिलवादे, कॉ विठ्ठल त्रिभुवन, शेहनाज बेगम,खाजा सय्यद, फरजाना पठाण, वाहेदा बेगम जावेद सय्यद,अर्चना पांचाळ आदी पालक उपस्थित होते.