पाकिस्तानात इम्रान खान सरकार पडले मध्यरात्री संसदेत अविश्वास ठराव मंजूर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव संसदेत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे इम्रान खान यांचं सरकार कोसळलं आहे.पाकिस्तानच्या संसदेत मध्यरात्री नाट्यमय घडामोडींदरम्यान हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
तर PML-N पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी सभागृहाला संबोधित करताना म्हटलं, " आम्ही आता पाकिस्तानात पुन्हा एकदा संविधान आणि कायद्याचं राज्य स्थापित करू इच्छितो. आम्ही कुणाची इर्षा वा द्वेष करणार नाही. पण कायदा आपलं काम करत राहील."
पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनीही याप्रसंगी भाषण केलं. ते म्हणाले, 10 एप्रिल या तारखेला ऐतिहासिक महत्व आहे. याच दिवशी 1973 साली पाकिस्तानचं संविधान पारित करण्यात आलं होतं. जुन्या पाकिस्तानात तुमचं स्वागत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल खालिद जावेद यांनीही राजीनामा दिला आहे.
इम्रान खान सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावावर (पाकिस्तानी वेळेनुसार) मध्यरात्रीच्या 5 मिनिटं आधी मतदानाला सुरुवात झाली. त्यापूर्वी स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर दोघांनी राजीनामा दिला. मतदानाला सुरुवात होताच मध्यरात्र झाल्यामुळे कामकाज 2 मिनिटांसाठी बरखास्त करण्यात आलं. नंतर पाकिस्तानी वेळेनुसार रात्री 12 वाजून 2 मिनिटांनी मतदान पुढे सुरू राहिलं. दरम्यान, इम्रान खान यांनी पंतप्रधान निवासस्थान सोडलं.