कसाबखेडा पुल वाहून गेला अन गावांचा संपर्क तुटला
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गाव व परीसरात काल झालेल्या पावसाने दाणादाण उडविल्याने गावाजवळील पुल वाहून गेल्याने तब्बल सहा गावांचा संपर्क तुटल्याने काय पाऊस,काय रस्ते अन काय गावांचे हाल अशी गत सध्या येथे झाली आहे.
कसाबखेडा गावाशी माटेगाव,चांभारवाडी,देभेगाव,देवळाणा,पिंपळगाव या गावातील लोकांचा दैनदिन व्यवहार असल्याने दररोजचा संपर्क आहे.कसाबखेडा परीसरातील अनेक शेतकरी शेतात वास्तव्यास आहे.
गावात शाळा, बँक, दवाखाने आणि मोठी बाजारपेठ आहे. कसाबखेडा परीसरातील शेतकरी आणि माटेगाव, चांभारवाडी, विटखेडा,देभेगाव ,देवळाना,पिंपळगाव या गावातील लोकांची वर्दळ गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील पुलावरुन होत असते. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नळकांडी पुल वाहून गेला,त्यामुळे या गावातील नागरीकांच्या दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होऊन कसाबखेडा गावाशी संपर्क तुटला आहे.
शालेय विद्यार्थी, शेतकरी, दुर्धर आजारी यांना खुप त्रास सोसावा लागणार आहे. कसाबखेडा गावात माटेगाव व परीसरातुन शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी हा एकमेव जवळचा रस्ता असल्याने शाळेत वेळेवर येता येत होते. पुल वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांना वेरुळ मार्ग सात किलोमीटर लांबीचा वळसा घालून यावे लागते. त्यातही वाहनांची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येणे कठीण झाले.
विद्यार्थ्यांनावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी सिमेंट पुल बनविल्यास पावसाळ्यात कसाबखेडा गावाशी तुटणारा संपर्काची समस्या दुर होईल. यासाठी आपल्या लोकप्रतिनिधीनी काय झाडी,काय डोंगर, काय हाटेल सगळं ओक्के यातून बाहेर पडून पावसाळ्यात ग्रामीण भागात होणाऱ्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.