कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसला आग

कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या एसी डब्याला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांची एकच तारंबळ उडाली. पण काही वेळातच ही आग अटोक्यात आणली गेली.
मुंबईसाठी कोल्हापूरातून रात्री ८.३५ च्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस निघते. यामध्ये अनेक आमदार , खासदार , सेलिब्रिटी यांचा समवेश असतो. यावेळी तर १५०० हून अधिक प्रवाशी ट्रेनमध्ये होते. ट्रेन नेहमीप्रमाणे आपल्या वेळेमध्ये कोल्हापूरवरून निघाल्यानंतर रुकडीच्या जवळ पोहचताच अचानक सर्वच डब्यांमध्ये जळाल्याचा वास येऊ लागला.
अनेक प्रवाशांना आग लागल्याची शंका येऊ लागली. अगदी काही वेळात एसी ट्रेनच्या डब्याला आग लागली. ही माहिती रेल्वे पोलिस सुधीर गिऱ्हे यांना कळाली. त्यांनी चेन ओढून तात्काळ ट्रेन थांबवली. रेल्वे पोलिसांनी खाली उतरून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस सर्वांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली.
आग लागण्याचे कारण
गाडीच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये हवा शिल्लक राहिल्यामुळे ब्रेक जाम झाले आणि गाडी धावू लागल्यानंतर घर्षणामुळे आगीची घटना घडली. यामध्ये फक्त ब्रेक शू जळले यानंतर बाकी चाकाला कोणताही धोका निर्माण झाला नाही.
चालक आणि गार्डने पाहणी केली असता एम - २ या वातानुकूलित बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. गाडीतील आग रोधक सिलिंडरने आग विझवून ती मिरजेकडे रवाना झाली. मिरजेमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एक तासाने ती मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान गाडीला मिरज स्थानकामध्ये तब्बल एक तास उशीर झाला.
सुदैवाने नदीलगत गाडी थांबली
कोल्हापूर स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर वळिवडे स्थानकाच्या काही किलोमीटरवर ही घटना घडल्यावर साखळी ओढून गाडी थांबवली. प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या आणि सुरक्षितस्थळी थांबले. गाडी सुरक्षित असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा प्रवास केला. दरम्यान या गाडीचे इंजन नदीशेजारी थांबल्यामुळे अनर्थ टळला. साखळी ओढल्यानंतर गाडी नदीवर थांबली असती तर प्रवाशांनी थेट नदीमध्ये उड्या घेतल्या असत्या आणि मोठी दुर्घटना घडली असती.