विवाहित प्रेयसीचा खून करून शेतात पुरले
संभाजीनगर/प्रतिनिधी - माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकताच संभाजीनगर मध्ये घडली आहे. महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच खून करून प्रेत लासुर स्टेशन येथील आपल्या शेतात पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार मोनिका सुमित निर्मळ असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर शेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांना ही घटना माहिती होताच पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. मोनिका ही जालना येथे राहत होती. दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये -जा करत होती. तसेच ती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे.
दरम्यान, या पार्किंगवर काम करीत असलेल्या शेख याच्यासोबत तिचे वर्षभरापासून संबंध जोडले होते. 6 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही. त्यामुळे आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासाचे चक्र फिरवली आणि तपास सुरू केला. अशातच तपासात आरोपी शेखने त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचे समोर आले.याप्रकरणी आता कदीम जालना पोलीस पुढील तपास करीत आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ परिसरात पसरली आहे.