लसीकरण वाढीसाठी आरोग्य दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश बेजबाबदार कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई
औरंगाबाद /प्रतिनिधी - जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे ग्रामपातळीवरील सर्व पदाधिकारी, सर्व विभागाचे कर्मचारी याना सहभागी करून घेत आरोग्य दक्षता समितीचे गठन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
आरोग्य विभागातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही लसीकरण अपेक्षेप्रमाणे पूर्ण करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर येत होते. याआनुशंगाने ग्रामीण भागात लसीकरण वाढीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागाचे कर्मचारी यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे समोर आले. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य दक्षता समिती गठीत करण्याचे गुरुवार (१८) रोजी आदेश काढले आहे. या आदेशान्वये या समितीमध्ये सरपंच हे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत तर सदस्य म्हणून उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, तलाठी, कृषी सेवक, बी. एल. ओ. अंगणवाडी सेविका या असणार आहे. या समितीचे सदस्य सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक असणार आहे.
या समितीमार्फत कोविड लसीकरण करून घेण्यासाठी प्रबोधन करणे, पात्र नागरिकांचा पहिला व दुसरा डोस वेळेत पूर्ण करून घेणे, १०० टक्के लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मदत करणे, सर्व यंत्रणा मुख्यालयात राहत असल्याची खात्री करणे आदी कामे या समितीला देण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कर्मचाऱ्याविरुद्ध साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल सोबतच जबाबदारी पार न पडणाऱ्या लोकप्रतिनिधी विरुद्ध अपात्रतेची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे या आदेशात म्हंटले आहे. या आदेशावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.