झू ऑथॉरिटी कडून मनपाला पुन्हा  दिलासा

झू ऑथॉरिटी कडून मनपाला पुन्हा  दिलासा

औरंगाबाद /प्रतिनिधी- सफारीपार्कच्या नियोजित प्राणिसंग्रहालयाला सेंट्रल झू ऑथॉरिटीने मंजूरी दिली आहे. झू ऑथॉरिटीच्या ३८ व्या बैठकीत हा मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सफारीपार्कमध्ये प्राणिसंग्रहालय सूरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

      .महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय मागील काही वर्षांपासून अपुरी जागा आणि असुविधांमुळे वादात सापडले आहे.  त्यामुळे सेंट्रल झू ऑथॉरिटी ऑफ इंडियाने १९ नोव्हेंबर २०१८ रोजी महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयाची मान्यता काढून घेतली होती. त्यानंतर मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे धाव घेऊन प्राणीसंग्रहालयात आवश्यक कामे तातडीने करण्याची हमी दिली. त्यावर झू ऑथॉरिटीने फेब्रुवारी २०१९ मध्ये एक वर्षासाठी म्हणजे फेब्रुवारी २०२० पर्यंत प्राणीसंग्रहालयाला मान्यता बहाल केली.

    हा कालावधी संपल्यानंतर झू ऑथॉरिटीचे पथक पाहणीसाठी येणार होते. परंतु त्याचवेळी कोरोना संसर्ग सुरु झाला. तब्बल दोन वर्षांनी झू ऑथॉरिटीने मनपाला पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिला आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता सेंट्रल झू ऑथॉरिटीने सफारीपार्कच्या प्राणिसंग्रहालयास मंजूरी दिली आहे. सेंट्रल झू ऑथॉरिटीच्या १६ नोव्हेंबर रोजीच्या झालेल्या ३८ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १९७२ च्या वन्यजीव कायदा मधील ३८ एच (ए) (१) तरतूदीनुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासंबंधीचे पत्र १७ डिसेंबर रोजी मनपाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे सफारीपार्कमधील प्राणिसंग्रहालयाचा  मार्ग मोकळा झाला आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सफारीपार्कमधील प्राणिसंग्रहालयाला मंजूरी मिळावी या दृष्टीने सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे पाठपुरावा केला. सेंट्रल झू ऑथॉरिटीच्या परवानगीमुळे आता सफारीपार्कच्या कामाला गती मिळेल, असे उपायुक्त सौरभ जोशी यांनी स्पष्ट केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा