नातेवाईकांचा पोलीस स्टेशन समोर ठिय्या मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
वाळुज /प्रतिनिधी - औरंगपूर हर्सूली येथील नुकताच लग्न झालेल्या २२ वर्षीय विवाहितेचा मृतदेह संशयास्पदरीत्या विहरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, प्रांजली अक्षय शिंदे ( वय २२, रा. हर्सूली, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) हीचा चौदा महिन्यांपूर्वीच अक्षय शिंदे यांच्यासोबत विवाह झाला होता. परंतु लग्नानंतर काही दिवसातच तीचे सासु, सासरे व पती तिला त्रास देत होते असे तिच्या नातेवाईकांचे सांगणे आहे. मुलगी काही दिवसापूर्वीच माहेरी आली होती तेव्हा तिच्या भावाने तिची समजूत काढून तिला सासरी परत नेऊन सोडले. सासरच्या लोकांनाही तुमच्या मागण्या आम्ही काही दिवसात पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. परंतु अचानकच प्रांजल शिंदे हिचा मृतदेह अक्षय शिंदे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याचे त्यांना कळवण्यात आल्याने प्रांजलच्या आई-वडिलांना धक्काच बसला. आम्ही मागण्या पूर्ण करणार होतो तरीदेखील वाट न पाहता आमच्या मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप प्रांजलच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी प्रांजलच्या मृत्यूस कारणीभूत लोकांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही या मागणीसाठी प्रांजलच्या नातेवाइकांनी पोलिस स्टेशन समोर ठिय्या मांडला आहे.