तिने का नेला मृतदेह 600 किलोमिटर दूर
मुंबई / प्रतिनिधी- कल्याणमधील महिलेने पतीशी होणाऱ्या सततच्या भांडणाला कंटाळून पतीचा खून केला आणि जावई व मुलीच्या मदतीनं त्याचा मृतदेह घरापासून 600 किलोमीटर अंतरावर टाकून दिला.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील राजेंद्रनगर पोलिसांनी ही घटना उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कल्याण येथील ६० वर्षीय राजकुमारी मिश्रा, तिचा जावई उमेश शुक्ला आणि मुलगी नम्रता शुक्ला यांना ताब्यात घेतलं आहे.
रविवार (10 एप्रिल 2022) सकाळी इंदूरमधील राजेंद्रनगर पोलिसांना निहालपूर मुंडी येथील एका शेतात बेवारस ट्रॉली बॅग आढळली होती. त्या बॅगमध्ये एक अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता. हा मृतदेह महाराष्ट्रातील कल्याणमधील संपतलाल मिश्रा या व्यक्तीचा असल्याचं तपासात समोर आलं. संपतलाल मिश्रांच्या खूनाची मास्टरमाईंड त्यांची पत्नीच असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
राजकुमारी मिश्रा हिनं संपतलाल यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 600 किमीचा प्रवास केला. आपली मुलगी आणि जावयाच्या मदतीनं तिनं इंदूरमध्ये मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. पतीचा खून केल्यानंतर राजकुमारी मिश्रानं मृतदेह एका ट्रॉली बॅगमध्ये भरून उमेशच्या कार ट्रंकमध्ये ठेवला. त्यानंतर मुलगी नम्रता आणि जावई उमेशसोबत 600 किमी अंतरावर असलेलं इंदूर गाठलं.
तिथे निर्जन जागा पाहून तिघांनी मृतदेह पेटवून दिला. आरोपी उमेश हा मुंबईतील एका नामांकित मोबाईल कंपनीत काम करतो. चेकपोस्टवर पोलिसांनी गाडी चेक करू नये यासाठी त्यानं लहान मुलांनाही सोबत आणलं होतं. मात्र, राजेंद्रनगर पोलिसांच्या हाती मृतदेह लागल्यानंतर त्यांनी टोलनाके, हॉटेल आणि ढाब्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
या फुटेजमध्ये पोलिसांना घटनास्थळाच्या बाजूला एक संशयास्पद कार दिसली. टोल पॉईंटवरील सीसीटीव्ही फुटेज एकमेकांशी जुळवत इंदूर पोलीस उमेशपर्यंत पोहोचले. त्याचं लोकेशन तपासलं असता तो घटनास्थळी उपस्थित असल्याची पोलिसांना खात्री झाली. बुधवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच प्राथमिक चौकशीत त्यानं गुन्हा कबुल केला.
उमेशनं दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी राजकुमारी मिश्राला ताब्यात घेतलं. तिनंही गुन्हा कबुल केला. तिनं सांगितलं की, 'संपत आणि तिचे सतत वाद होत असत. गेल्या शनिवारी (9 एप्रिल 2022) झालेल्या बाचाबाचीदरम्यान संपत खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. संपत बेशुद्ध पडल्यानंतर राजकुमारीनं दवाखान्यात न जाता त्यांना ट्रॉली बॅगमध्ये टाकलं. त्यानंतर मुलगी नम्रता आणि जावई उमेशच्या मदतीनं संपत यांना इंदूरमध्ये आणून जाळलं.'