बंडखोर मंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थन रॅली ला शिवसैनिकांची पाठ
पैठण/ प्रतिनिधी - पैठण तालुक्याचे बंडखोर आमदार तथा कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत सामील झाले आहेत. पैठणचे शिवसेना आमदार तथा रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थनात पैठणमध्ये आज शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याने भूमरेंच्या समर्थनात केलेलं शक्तिप्रदर्शन फुसकाबार ठरल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. जेमतेम कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली. तर त्यापेक्षा पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे भुमरे यांच्या बंडखोरीमुळे पैठणच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भुमरे यांनी बंडखोरी करून राजकीय आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
सकाळी दहा वाजेच्या सुमरास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिकांना एकत्र येण्याचे आवाहन भुमरे समर्थकांकडून करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भूमरे यांच्या समर्थनात आणि शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या शक्तिप्रदर्शनाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली.
पैठण मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. आतापर्यंत भुमरे यांना याच मतदारसंघात शिवसेनेच्या तिकीटावर पाचवेळा विजय मिळाला आहे. तर जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत सेनेच्या ताब्यात आहे. पण असे असताना भुमरे यांच्या शक्तिप्रदर्शनाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याने त्यांचा निर्णय सर्वसामान्य शिवसैनिकांनी पटला नसल्याची चर्चा आहे.
या समर्थन रॅलीचे नियोजन मंत्री भुमरे यांचे सुपूत्र विलास भुमरे यांनी केले, परंतु ते रॅली मध्ये सक्रिय दिसले नाहीत त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी काढता पाय घेतला. या समर्थन रॅली मध्ये शिवसेना तालुका उपप्रमुख मनोज पेरे, जेष्ठ शिवसैनिक राजू परदेशी, राखी परदेशी ता.महिला आघाडी, युवा सेना तालुका प्रमुख विकास गोर्डे, मा.नगरसेविका पुष्पा वानोळे, दिलीप मगर यांच्या सह बरेच शिवसेनेचे पदाधिकारी यांची गैरहजेरी दिसली. पैठण तालुक्यात यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भुमरे यांनी बंडखोरी केल्यामुळे कडवट शिवसैनिकात नाराजीचा सूर दिसून येत आहे. शिवसेनेतून यांचे निलंबन झाल्यास त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येणार आहे कारण मध असला की माश्या येतात. अशी चर्चा पैठण तालुक्यातील गावागावात होत आहे.
शिवसेनेत मोठे फेर बदल
येणाऱ्या दोन दिवसांत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आंबदास दानवे हे पैठणला येणार असून पैठणच्या शिवसेनेत मोठे फेर बदल करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात काही जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते पैठण तालुक्यात शिवसेनेत दोन गट पहावयास मिळणार आहेत. खरे कडवट शिवसैनिक बंडखोरांच्या बाजूने जातात की, शिवसेनेच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात हे येणाऱ्या काळात पहावयास मिळेल.