संत एकनाथ रंग मंदिर खाजगीकरण विरोधात मनसे रस्त्यावर
औरंगाबाद/ प्रतिनिधी - संत एकनाथ रंग मंदिराच्या लोकार्पनाच्यावेळीच महापालिकेने अचानक खासगीकरणाचा निर्णय घेतल्यामुळे मनसेने या विरोधात सोमवार दि.२४ जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेचे करायचं काय; खाली मुंडकं वर पाय? अशा घोषणा दिल्या.
यावेळी मुळात इतका प्रचंड खर्च करुन खाजगीकरण कां केल ? आता हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याचा विरोध करण्यासाठी लोकाशाही मार्गाने आम्ही आठ दिवसापूर्वी महानगरपालिका आयुक्त यांना पत्र दिले होते. परंतु त्याचे उत्तर देखील देण्याची तसदी आयुक्तांनी घेतली नाही. रंगमंदिराच्या खाजगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे, १० कोटी रुपये खर्च झाल्यानंतर इतकी चांगली मालमत्ता आपण कंत्राटदाराच्या घश्यात का घालत आहात ? यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा वैयक्तिक स्वार्थ दिसत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह मनसैनिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.