समृद्धी महामार्गावर गॅसचा ट्रक पलटी
अहमदनगर / प्रतिनिधी - एचपी कंपनीच्या गॅसच्या टाक्या घेऊन जात असलेल्या ट्रकला काळवीट आडवे आल्याने सुरक्षा कठडे तोडून ट्रक थेट महामार्गावरून खाली पडली.
अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक चालक आयुब शेख (रा.शिवपुर ता. वैजापूर) हा रात्री औरंगाबाद येथून ट्रकमध्ये गॅसने भरलेल्या टाक्या घेऊन अमरावतीच्या दिशेने निघाला होता. ही ट्रक वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील केनवड गाव परिसराच्या हद्दीत आली तेव्हा पहाटे चार वाजता अचानक काळवीटांचा कळप ट्रकला आडवा गेला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला लावलेले सुरक्षा कठडे तोडून ट्रक पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पडली. यावेळी ट्रकमधील सर्व टाक्या खाली पडल्या होत्या. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मुख्य सुरक्षा रक्षक एस.एस. चिमुकले व सुरक्षा रक्षक गणेश सोनुने घटनास्थळी दाखल झाले.