अबब सुनेनेच केला सासऱ्याला मारायचा प्रयत्न
अहमदनगर/ प्रतिनिधी - सुनेने सेवानिवृत्त पोलीस सासऱ्याला अन्य दोघांच्या मदतीने विष पाजवून जिवे मारण्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात नुकताच घडली आहे.पीडित सासऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनेसह अन्य दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
यानदेव नामदेव जाधव असं 60 वर्षीय फिर्यादी सासऱ्यांचं नाव आहे. ते बोल्हेगाव येथील गांधीनगर परिसरातील रहिवासी आहेत. तर सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित सर्वजण अहमदनगर तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसरातील शेंडी बायपास येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी फिर्यादी जाधव हे पाथर्डी तालुक्यातील मोहोज येथून आपल्या मुलाकडे दुचाकीने चालले होते. दरम्यान कोल्हार घाटमार्गे शेंडीबायपासने वडगाव गुप्ता शिवारातील नदीजवळून जात असताना, त्यांची सून सोनाली हिने हात दाखवून जाधव यांची दुचाकी थांबवली. यावेळी फिर्यादी जाधव आपली दुचाकी डबल स्टॅन्डवर लावत होता.
दरम्यान सुनेनं अचानक फिर्यादी जाधव यांना खाली पाडलं आणि ती जाधव यांच्या पायावर बसली यावेळी आरोपी बाळासाहेब याने जाधव यांचे हात धरले आणि वैभव याने जाधव याचं नाक दाबून त्यांच्या तोंडात विष ओतलं. तू निवृत्त पोलीस असल्याने तुझ्यावर मी दाखल केलेल्या गुन्ह्यात तुला पोलीसांनी अटक केली नाही. आता इथे तुला कोण वाचवणार?
असं म्हणत सुनेसह अन्य दोघांनी फिर्यादी जाधव यांना शिवीगाळ केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर जाधव यांना अहमदनगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जावून जाधव यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.