औरंगाबाद, उस्मानाबादनंतर ‘या’ शहराचं नामांतर?; एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर ‘या’ शहराचं नामांतर?; एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

मुंबई: औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर नुकताच राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर केलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे संकेत दिले आहेत.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली.

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्याबाई होळकरांचं नाव

'धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोई-सुविधा दिल्या जातील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील. अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे ही माझीही इच्छा आहे. राज्यात त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल. अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा