पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या नातेवाईकांनी केला पोलिसांवर आरोप
औरंगाबाद / प्रतिनिधी - औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाकांनी केला आहे. त्यांनतर मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमल्याने मोठा गोंधळ उडाला होता. एवढच नाही तर आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा मृतदेह तब्बल 9 तास पोलीस ठाण्याच्यासमोर पडून होता. मोहन गोरख राठोड (वय24, रा. दाभरुळ ता.पैठण ) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन राठोडच्या पत्नीने सासरकडील मंडळीविरोधात हुंडा मागत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पाचोड पोलिसात केली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर पाचोड पोलिसांनी मोहन राठोडसह त्याच्या घरच्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. पोलीस ठाण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोहनला नातेवाईकांसमोरच मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. नातेवाईकांसमोर मारहाण झाल्याने मोहनच्या मनात आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे त्याने विष घेऊन आत्महत्या केल्याचा आरोपही त्याचा कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.
पोलीस ठाण्यात जमाव...
पोलिसांनी मारहाण केल्यानेच मोहनने आत्महत्या केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे गावातील नागरिक आणि मोहनच्या नातेवाईकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी जमावाने केली. परिस्थिती पाहता पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्यासह आणखी दोन पोलीस ठाण्याचा फौजफाटा पाचोडला बोलवण्यात आला. मात्र कारवाई केल्याशिवाय जाणार नसल्याची भूमिका जमावाने घेतल्याने पोलीस अधिकारी सुद्धा हतबल झाले.
मृतदेह 9 तास पडून....
मोहनने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्याच्या समोर आणून ठेवला. मोहनला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. यावेळी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याच आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मोहनच्या नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे तब्बल 9 तास मृतदेह पोलीस ठाण्याच्या समोर पडून होता. त्यांनतर मृतदेह फुगू लागल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.