आरोग्य भरतीतील सावळागोंधळ दूर करा : प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे
औरंगाबाद /प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य आरोग्य भरती गट 'क व ड' आणि सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (SET) परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रचंड नुकसान होणार आहे.
दिनांक २६ -०९ -२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग भरती परीक्षा गट - ड आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (SET) एकाच दिवशी येत असल्यामुळे यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षेसाठी अर्ज केलेले आहेत. सदर परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न भंग होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी या पदांकरिता परीक्षा आयोजित केली होती परंतु यात झालेल्या गैरव्यवहारामुळे परीक्षा रद्द करण्यात आलेली होती. त्यातच पुन्हा आरोग्य विभागाचा अशा सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थी व पालक संभ्रम अवस्थेत आहेत. तसेच दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या ग्रुप 'क' या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी दोन पदांसाठी अर्ज केले आहेत त्यांचे एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा केंद्र आले आहेत. या परीक्षेतील सावळा गोंधळ व गैरव्यवहारा संदर्भात अभाविप ने महात्मा फुले चौक, संभाजीनगर या ठिकाणी परीक्षेतील गोंधळाचा व महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करून विद्यार्थ्यांनी ज्या पदांकरिता अर्ज केलेला आहे अशा सर्व पदांची परीक्षा देण्याची संधी द्यावी अशी मागणी अभाविप प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केली. तसेच या मागणीचे पत्र ऑनलाइन ई-मेलच्या माध्यमातून अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांना पाठविले आहे अशी माहिती दिली. यावेळी जिल्हा संयोजक श्यामसुंदर सोडगीर, जिल्हा सह नागेश गलांडे, महानगर सहमंत्री ऋषिकेश केकान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.