हे मूल कोणाचे ? रेल्वेत सापडले नवजात अर्भक
जळगाव / प्रतिनिधी - महानगरी एक्स्प्रेसच्या (बोगी क्रमांक एस-३ मध्ये) शौचालयात एक नवजात अर्भक सापडल्याने रेल्वेमध्ये हे मुल कोणाचे असा एकच प्रश्न सर्व प्रवाशांना पडला होता.कारण त्या नवजात बालकाची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नव्हते.
अविवाहित तरूणीची प्रसूती झाली. परंतु, नवजात बाळाला फेकून कुमारी मातेने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशांच्या सतर्कतेने सदर प्रकार उघडकीस येऊन भुसावळ ते पाचोरादरम्यान या मातेचा शोध घेण्यात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले. यानंतर माता व बाळ अशा दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महानगरी एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस-३ मधून १९ वर्षीय अविवाहित माता असलेली तरुणी व तिची आजी खंडवा ते मुंबईदरम्यान प्रवास करीत होती. तरुणीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिने धावत्या रेल्वेतच पुरुष जातीच्या अर्भकाला जन्म दिला. मात्र बाळ अनैतिक संबंधातून जन्मल्याने त्याची वाच्यता टाळण्यासाठी तरुणीने ते शौचालयात टाकले व सीटवर जाऊन बसली. घडला प्रकार एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांना कळविला.
कुमारी मातेविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणी मातेविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसांत नवजात अर्भक बेवारसरीत्या टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मातेसह अर्भकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली असून, पोलिस निरीक्षक विजय घेर्डे व सहकारी तपास करीत आहेत.