विधवा महिलांना सन्मानजनक वागणूक व विधवा प्रथा बंद करण्याची मागणी
परळी /प्रतिनिधी - सध्याच्या विज्ञान युगात महिलांची कुचंबणा व अपमान करणारी विधवा प्रथा बंद करून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासंदर्भात परळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथा बंद करण्यासाठी विनंती पुर्वक निवेदन देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून तडोळी ग्रामपंचायतीला विधवा प्रथा बंद करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये आपल्या समाजात पतीच्या अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे तसेच नंतर विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमास त्या महिलेला सहभागी करून न घेणे यासह त्या महिलांना वारंवार धार्मिक प्रथेच्या आडून अपमानजनक वागणूक मिळत असते. विधवा महिलांना सुद्धा सन्मानजनक वागणूक मिळावी तो त्यांचा अधिकार आहे व चुकीच्या प्रथा बंद करण्यात याव्यात. या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीने ठराव घेऊन महिलांना सन्मान बहाल करावा अशा पद्धतीची संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनात विनंती केली आहे. एका बाजूला विधवा महिलांना अपमानित करणारे अनेक चुकीच्या पद्धती असताना दुसऱ्या बाजूला रंडव्या पुरुषाला प्रत्येक ठिकाणी सन्मानजनक वागणूक मिळते हा महिलांवर होणारा एकतर्फी अन्याय असून ज्या पुरुषांची बायको मरण पावते त्या पुरुषाला कसल्याही प्रकारचे दूषणे किंवा नाव ठेवले जात नाही. दुसऱ्या बाजूला ज्या महिलेचा नवरा मरण पावला त्या महिलेला रंडकी, विधवा, पांढर कपाळी, पालथ्या पायाची, अपशकुनी तिचे तोंड बघितले तर कुठलेही काम होत नाही अशा पद्धतीचे दूषणे देऊन तिला अपमानित करण्याच्या अनेक घटना समाजामध्ये होत आहेत. त्यामुळे या प्रथा बंद होणे गरजेचे आहे. वारकरी धर्माच्या माध्यमातून सर्व संतांनीसुद्धा महिलांना सन्मान दिला आहे. "सकळाशी येथे आहे अधिकार" ह्या तुकाराम महाराजांच्या ओळीप्रमाणे महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून व त्यांच्या बरोबरीने सन्मानजनक जगण्याचा अधिकार बहाल केला आहे. वारकरी धर्मामध्ये एकमेकांना सन्मान देणे एकमेकांच्या पाया पडणे सोबतच विधवा महिलांच्या सुद्धा सन्मानाने पाया पडले जाते दुसरी गोष्ट वारकरी धर्माचा जो गंध आहे "अबीर बुक्का" महिलांना पुरुषांना लहान थोरांना, विधवा महिलांना सुद्धा लावण्याचा पुरेपूर अधिकार वारकरी धर्माने दिला आहे. त्याच वारकरी धर्माची शिकवण आम्ही अंगीकरणार आहोत का नाही ? अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा या प्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विचारण्यात येत आहे. वारकरी धर्माने महिलांना खूप सन्मानजनक वागणूक दिलेली आहे या पुढचे पुरुषांपेक्षा महिलांना सन्मान खूप मोठा बहाल केलेला आहे हा आपल्याला धार्मिक पुरावा असून यापुढे तरी आपल्या गावामध्ये विधवा महिलांना सन्मानजनक वागणूक मिळावी हीच संभाजी ब्रिगेडची माफक अपेक्षा आहे फक्त पुरुषांचा एककलमी कार्यक्रम चालू असून वारंवार महिलांना अपमानित करण्यासाठी व महिलांचे खच्चीकरण करून बहुजन समाजाला मानसिक दृष्ट्या दाबण्याचा हा प्रकार असून ही कुप्रथा बंद करण्यात यावी. अशा पद्धतीचा ग्रामपंचायत मध्ये ठराव घ्यावा व महिलांना सन्मान द्यावा ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे या भूमिकेचं सर्व स्तरातून खूप अभिनंदन व कौतुक होत आहे या 21 व्या शतकामध्ये एका बाजूला जगाने खूप मोठी क्रांती केली आहे प्रगती केली आहे व दुसऱ्या बाजूला त्याच जगाच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या महिलांचा असा अपमान या ठिकाणी होत आहे याचं कुठेतरी आपण सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे घरामध्ये सार्वजनिक शुभ कार्यात विधवा महिलांना सामावून घेतले जात नाही त्यांच्या हातून घरातील आनंदोत्सवाच्या व लग्न समारंभ इतर काही धार्मिक शुभकार्यामध्ये सामावून घेतलं जात नाही त्यांना बाजूला सारल्या जात आहे एखाद्या विधवा महिलेच्या मुलाचे लग्न जर झाले तर त्या मुलाच्या लग्नाच्या बऱ्याच धार्मिक सोहळ्यात कार्यात त्या महिलेला नवरदेवाच्या आईला सामावून घेतले जात नाही हा एक प्रकारचा महिलांवर अन्याय असून विधवा महिलांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा पुरेपूर संविधानाच्या माध्यमातून व वारकरी धर्माने दिलेला अधिकार आहे तो अधिकार त्या महिलांना बहाल करून त्यांना सन्मानपूर्वक जगण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन अशा चुकीच्या विधवा कुप्रथा बंद करून एक क्रांती घडवावी अशी लेखी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडच्या वतीने परळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज संभाजी ब्रिगेड कार्यालयात तडोळी ग्रामपंचायतचे सरपंच शिवश्री अशोक शिरसाट,उपसरपंच शिवश्री वैजनाथ सातभाई, ग्रामपंचायत सदस्य शिवश्री प्रभाकर सटाले, गावातील जेष्ठ शिवश्री दौलत सातभाई यांना निवेदन देऊन आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथा बंद व्हावी त्या पद्धतीचा ठराव घ्यावा ही लेखी विनंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने केली आहे याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या वतीने ग्रामपंचायत तडोळी यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा संघटक शिवश्री सेवकराम जाधव सर,तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज दिसत आहेत.