“रावसाहेब विचित्र, धोकेबाज माणूस, अर्जुन श्रीकृष्णाचेच ऐकणार”; चंद्रकांत खैरेंचा दानवेंवर हल्लबोल
औरंगाबाद : जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली होती. यामुळे खोतकर आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत का? अशा चर्चा सुरु आहे. या भेटीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानेंवर टीकास्त्र सोडलं आहे. रावसाहेब दानवे विचित्र, धोकेबाज माणूस असल्याची टीका खरैंनी केली आहे. एवढचं नाही तर अर्जुन श्रीकृष्णाचचं म्हणजे उद्धव ठाकरेंचचं ऐकतील, असा विश्वासही खरैंनी व्यक्त केला आहे.
ईडीच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांवर दबाब टाकण्याचा प्रयत्न
रावसाहेब दानवे विचित्र, धोकेबाज माणूस आहे. शिवसेना- भाजपाची युती असतानाही त्यांनी मला धोका दिला. एवढचं नाही तर दानवेंनी आपल्या स्वत:च्या मुलीचा संसार मोडल्याचा धक्कादायक आरोपही खैरेंनी केला आहे. जालना जिल्ह्यातील अनेक लोकांचा दानवेंवर विश्वास नाही. ते क्षणाक्षणाला आपलं वक्तव्य बदलतात. भाजपाकडून शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून दबाब टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचाच फटका खोतकरांना बसला असल्याचे खैरे म्हणाले.
अर्जुन खोतकर कडवट शिवसैनिक
अर्जुन खोतकरांनी त्यांच्या ईडीच्या कामासाठी दिल्ली गेली असल्याची कल्पना मला दिली होती. अर्जुन खोतकर हे कडवट शिवसैनिक आहेत त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. त्यांचं नाव अर्जुन असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना श्रीकृष्णासारखे आहेत. त्यामुळे खोतकर उद्धव ठाकरेंचचं ऐकतील असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला आहे. अर्जुन खोतकर एकच व्यक्ती आहे जी रावसाहेब दानवेंना सरळ करु शकते असा टोलाही खैरेंनी दानवेंना लगावला आहे.