एका पाठोपाठ एक दोन बसला आग

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी  - गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकात उभ्या असलेल्या कंपनीच्या एका बसला अचानक आग लागली ही बस जळून खाक झाली. मात्र शेजारीच असलेल्या दुसऱ्या बसचाही पाठीमागील भाग जळाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूतगिरणी चौकातील देशी दारूच्या दुकानाजवळ रोडच्या बाजूला राजकुमार यादव यांच्या ट्रान्स्पोर्टमार्फत चितेगाव येथे कामगारांना सोडणाऱ्या बस (एमएच २० - ईजी ९८५१)चे चालक अण्णासाहेब मस्के व बस (एमएच २० - सीटी ९८५१)चे चालक किरण कुमावत यांनी कामगारांना कंपनीतून आणून सोडले. त्यानंतर बस दररोज उभी करण्याच्या ठिकाणी लावून घरी निघून गेले. यातील पहिली बस जास्त जळाली. त्या बसच्या शेजारीच दुसऱ्या बसचा पाठीमागील भागही मोठ्या प्रमाणात जळाला.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगरचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पुंडलिकनगरच्या निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची गर्दी झाल्यामुळे काही काळ वाहतूकही जाम झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केल्याचे निरीक्षक केंद्रे यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नका -
पार्किंगमध्ये लावलेल्या बस जळाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत; पण, त्या मेसेजसोबतच जाळपोळ झाल्याचा चुकीचा मेसेजही फॉरवर्ड करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी केले आहे. चुकीचे मेसेज फॉरवर्ड करताना कोणी आढळल्यास गुन्हे नोंदविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा