कार - ट्रकची भीषण धडक
कातरखटाव / प्रतिनिधी - कातरखटाव येथे मिरज-भिगवण मार्गावर कार व ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात कार चक्काचूर झाली आहे.यामध्ये कारमधील दोघेजण जखमी झाले. नीलेश मुरलीधर बोबडे (वय ४५) व संदीप बर्गे (४० रा. माळेगाव जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कार (एमएच ०८-झेड ८७८७) मंगळवारी बारामतीहून सांगलीकडे जात होती. मिरज-भिगवण मार्गावर कातरखटाव येथ उसाच्या ट्रॉलीस ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या (एमएच २०-एफटी ७२००) ट्रकला कारची जोरदार धडक झाली. यात दोघेजण जखमी झाले.
हा अपघात इतका भीषण होता, की कार चक्काचूर झाली. अपघातानंतर आजूबाजूच्या व गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराजे देशमुख तपास करीत आहेत.