१६८० कोटी पाणी पुरवठा जलवाहिनीचे काम संथगतीने खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी
औरंगाबाद / प्रतिनिधी- खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराला वेळेवर व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत १६८० कोटीच्या योजनेतुन होत असलेले जलवाहिनीचे काम कार्यादेशाप्रमाणे विहित वेळेत न होता संथगतीने व ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे होत असल्याने नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद शहरातील नागरीकांची पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली अडचण गंभीरस्वरुपाची असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिनांक 09 डिसेंबर 2021 रोजी पत्राव्दारे होत असलेल्या कामाची सद्यस्थितीची माहिती मागीतली असुन तसेच वेळेवर काम पुर्ण होवुन औरंगाबाद शहराला वेळेवर व मुबलक पाणी मिळावे म्हणून सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मासिक बैठकीचे आयोजन करण्याचे कळविले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी विहित वेळेत जलवाहिनीचे काम पूर्ण न झाल्यास तसेच समांतर जलवाहिनी प्रमाणेच या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेचे काम रखडले गेल्यास औरंगाबाद शहरातील नागरीकांना पुन्हा एकदा वेळेवर मुबलक पाणी मिळण्यापासून वंचित रहावे लागणार असल्याची शंका निर्माण झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यासह विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना सुध्दा पत्राव्दारे योग्य ती कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, औरंगाबाद शहराला मुबलक व वेळेवर पाणी पुरवठा व्हावा याकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत १६८० कोटीच्या योजनेतुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबादच्या निगराणीत व देखरेखीत जलवाहिनीचे कामे सुरु आहेत.
सदरील योजनेतंर्गत मंजुरी प्राप्त पाणी पुरवठ्याच्या कामांना करारात नमुद केल्याप्रमाणे अटी, शर्तीच्या अधिन राहुन विहित वेळेत दर्जेदार व गुणवत्तापुर्ण काम करणेकामी कार्यादेश संबंधितांना देण्यात आले होते. परंतु शासनाने दिलेल्या कार्यादेशात नमुद केलेल्या विहीत वेळेत काम न होता ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे काम होत असल्याचे दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.