कार उलटून भीषण अपघात
लातूर / प्रतिनिधी - लातूरच्या चलबुर्गा पाटीजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. निलंगा महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.पुण्याहून लग्न समारंभ आटपून गावी परतताना हा भीषण अपघात झाला.
चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं पुलाखाली कार पलटी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सर्व व्यक्ती निलंगा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर (रा. दत्तनगर) हे कुटुंबासह पुणे येथून निलंग्याकडे येत होतं.
दरम्यान, कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटली. त्यात सचिन यांची दोन मुलं, एक पुतण्या आणि एक मेव्हणा जागीच ठार झाले. तर सचिन बडूरकर, त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत.अपघातातील जखमींवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.