बाजीराव मस्तानी वाळूज पोलिसांच्या कैदेत
वाळूज /प्रतिनिधी - महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करण्यात येतो. गुटखा बंदी फक्त कागदा पूरतीच उरली आहे प्रत्यक्षात मात्र सर्रासपणे टपऱ्यावर गुटख्याची विक्री होते ती देखील चढ्या दराने. पोलिसांनी ठरवल्यावर ते या सर्व गोष्टींवर आळा घालू शकतात हे निश्चित. वाळूज पोलिसांनी देखील आपल्या कार्य तत्परतेचे उत्तम उदाहरण देत दि. 2 जानेवारी रोजी 94 लाखाचा गुटखा जप्त केला आहे.
दि. 2 जानेवारी रोजी परिमंडळ एकचे पोलीस उपयुक्त नितीन बगाटे यांना माहिती मिळाली की महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन टेम्पो (क्र. MH 13 DQ 8124) हा धुळे सोलापूर हायवे रोडने कासबर्ग कंपनी मार्गे साजापूर कडे जाणार आहे. त्यांनी ही माहिती त्वरित पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना देऊन माहितीची खात्री करून कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पोनि कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून टेम्पोला पकडले. यामध्ये मोहम्मद शफीर मोहम्मद सादिक (वय 46, रा. शाकीर किराणा दुकानाजवळ, नागपूर गेट ता. जि. अमरावती), ताहेर खान सईद खान (वय 37, रा. आठवणी आठवडी बाजार वडनेरा ता. जि. अमरावती),
आणि रफिक शेख (वय 35, रा. रहेमानिया कॉलनी, किराडपुरा, संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. यांच्या जवळून 60,00660/- रु. किमतीचा बाजीराव सुगंधित पान मसाला, 12,00132/- रु. किमतीचा मस्तानी - 216 असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला व 22 लाख रुपये किमतीची दोन वाहने त्यामध्ये आयशर टेम्पो व सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार,15 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण 94,15, 792 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि मनोज शिंदे करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त, प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहा. पोलीस आयुक्त छावणी विभाग महेंद्र देशमुख, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सपोनि मनोज शिंदे, पोउपनि प्रविण पाथरकर, पोउपनि दिनेश बन, पोह. सुरेश कचे, पोह. जालीधर रंधे, पो.अं. पो. अं. विशाल पाटील, पो. अं. नितीन इनामे पो. अं. समाधान पाटील, पो. अं. योगेश शेळके, पो.अं. किशोर साबळे, पो. अं. शिवनारायण नागरे, पो. अं. बबलु थोरात यांनी पार पाडली.