गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट
परळी /प्रतिनिधी - बीड शहरातून एक भयंकर घटना समोर आली आहे. बीडच्या परळी शहरात एका घरात अचानक गॅसच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्देवी घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील बरकत नगर भागात घडली.
अदिल उस्मान शेख (वय १४) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर परळी शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीवरून घटनास्थळ असणाऱ्या घराच्या बाजूला आग लागली होती. आग एका बंद असलेल्या रूममध्ये जाऊन तेथील गॅसचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की बाजूला असलेल्या अदिल शेख याच्या पोटाला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
तर शमशाद बी सय्यद हाकीम,शेख आवेस गौस व अन्य दोन जण जख्मी झाले. दरम्यान घटनेची माहिती कळताच परळी पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.