शैक्षणिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्वरीत समिती गठीत करण्याचे आदेश
औरंगाबाद /प्रतिनिधी - शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासुन औरंगाबाद जिल्हातील व शहरातील काही शाळेतील व्यवस्थापन कमिटी ही पालकांवर शैक्षणिक शुल्क सक्ती, थकीत शैक्षणिक शुल्कात टप्प्या-टप्प्याने भरण्याची सुविधा न देणे, अत्यावश्यक सुविधा नसलेल्या बाबींसंबंधी अतिरिक्त शुल्क लावणे, शाळेतुनच अथवा ठराविक दुकानातुनच शैक्षणिक अभ्यासक्रम व साहित्यांची खरेदी करण्याची सक्ती, शासनाच्या शैक्षणिक योजना व सुविधांचा लाभ न देणे तसेच शैक्षणिक कागदपत्रांची अडवणुक करत असल्याचे शेकडो तक्रारी पालकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे केली होती.
सर्व तक्रारी ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडीत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी तक्रारींची गंभीरतेने दखल घेवुन पालकांच्या शैक्षणिक तक्रारी, अडचण व समस्यांचे निराकरण होणेस्तव जिल्हास्तरीय व शहरस्तरीय समिती गठीत करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक औरंगाबाद विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना पत्राव्दारे कळविले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात व शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर या शैक्षणिक वर्षात सर्व माध्यमांच्या शाळा पुर्णपणे उघडले असुन दोन वर्षानंतर कोरोनाचे सर्व प्रकारचे नियम शिथिल झाल्यानंतर प्रथमच शाळेत जाणार असल्याने विद्यार्थ्यांत व पालकांत उत्सुकता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये म्हणुन सर्व शाळांची बैठक घेवुन विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश देण्याचे शिक्षणाधिकारी यांना कळविल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.