राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
औरंगाबाद / प्रतिनिधी - मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा ‘राष्ट्रीय मतदार दिनाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम’ यावर्षी 25 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, शिवाजी शिंदे, स्वप्नील मोरे, श्रीमती अंजली धानोरकर, संगीता सानप आदी अधिकारी उपस्थित होते.
25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, मुख्य अतिथी अभिनेता व संस्थापक नाम फाऊंडेशन मकरंद अनासपुरे, अभिनेत्री श्रीमती चिन्मयी सुमीत, विशेष निमंत्रित विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, प्रा. डॉ. दीपक पवार हे असून मुख्य आयोजक प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे तर सहआयोजक प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे असणार आहेत.
कार्यक्रमाच्या ठिकाणी मतदार जागृती दालनात अभिरुप मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे, याठिकाणी मतदान प्रक्रीयेशी संबंधित पुस्तके, प्रेक्षकांसाठी मतदान जागृतीचे खेळ,मतदार जागृती रांगोळी, सेल्फी पॉईंट, लोकशाहीची भिंत असे विविध प्रकार असणार आहेत. यावेळी ‘लोकशाही समजून घेताना’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील होणार आहे.