दोन दुचाकींचा भिषण अपघात
जालना/प्रतिनिधी- जालना येथील हॉटेल निवांत समोर दोन दुचाकी वाहनांमध्ये जोरात धडक होऊन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी संतोष ढगे (वय४५) यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमी अवस्थेतील भाजप पदाधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.
मृत ढगे हे भारतीय जनता पक्षाचे जालना तालुका सरचिटणीस होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ढगे हे बुधवारी दुपारी जालना बसस्थानकापासून औरंगाबाद चौफुलीकडे जात होते. दरम्यान औरंगाबाद रोडवरील हॉटेल निवांत समोरून जात असताना, समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भयंकर होता की, संतोष ढगे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी बदनापूर तालुक्यातील खामगाव येथील दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ढगे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.