जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी
औरंगाबाद /प्रतिनिधी - औरंगाबाद शहरातील पैठणगेट भागातील सब्जी मंडी परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही बाजूने दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव समोरासमोरआल्याने झालेल्या मारहाणीत काही जखमी सुद्धा झाले आहेत.
यावेळी वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली. याप्रकरणी दोन्हीं गटांच्या तक्रारीवरून एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच पोलिसांनी दिलेल्या वेगळ्या फिर्यादिवरून दोन्ही गटातील दीडशे ते दोनशे लोकांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, क्रांती चौक पोलीस ठाणे हद्दीतील पैठणगेटच्या सब्जी मंडी परिसरात एका शासकीय जमिनीच्या वादातून दोन गट आमने सामने आले. पाहता-पाहता दोन्हीकडील दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव जमा झाला. सुरवातीला एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. मात्र पुढे वाद एवढ्या विकोपाला गेला की, दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना मारहाण करायला सुरवात केली. क्रांती चौक पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
गाड्यांची तोडफोड...
दोन गटात वाद सुरु असल्याची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल पांडुरंग सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव एकमेकांना शिवीगाळ करत गाड्यांची तोडफोड करत होते. यावेळी सोनवणे आणि त्यांच्यासह असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या आदेशाला न जुमानता दोन्ही गटातील लोकं एकमेकांना मारहाण करत होते. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवत नियंत्रण मिळवले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अमोल पांडुरंग सोनवणे यांच्या फिर्यादिवरून दीडशे ते दोनशे लोकांविरोधात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकमेकांच्या विरोधात तक्रार...
याप्रकरणी राणी राहुल मगरे (वय 32, सब्जीमंडी पैठणगेट) यांच्या तक्रारीवरून 10 लोकांविरोधात शिवीगाळ करून लाथबुक्क्याने मारहाण केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शैलेन्द्र राजेन्द्र भोळे (वय 30 वर्षे,खोकडपुरा औरंगाबाद) यांच्या तक्रारीवरून राणी राहुल मगरे यांच्यासह 27 ओळखीच्या आणि दहा ते पंधरा अनोळखी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.