गुन्हे शाखेची मोठी कारवाई गुटख्या सह साडे एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त
औरंगाबाद / प्रतिनिधी : प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू राहत्या घरी साठा करून ठेवलेल्या ठिकाणी छापा टाकून साडे एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात मंगळवारी आहे. ही घटना शहरातील मुकुंदवाडी भागात उघडकीस आली.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, शेख हबीब शेख मदन (रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) या आरोपीने घरातच प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवला होता. हा व्यक्ती स्वतःच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला अवैधरित्या विकत होता. याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शाखेच्या वतीने या ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी 21 लाख 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी शेख हबीब मदन (वय 36), मोहसीन मुमताज (वय 25), खान शेख यासीन फत्तू (वय 43) तिघेही राहणार राजपूत क्लिनिक जवळ, इंदिरानगर, मुकुंदवाडी औरंगाबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त अपर्णा गीते, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढूमे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा औरंगाबाद शहर अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, रमाकांत पटारे, रमेश गायकवाड, विजय निकम, चंद्रकांत गवळी, हिरा चिंचोळकर यांच्या पथकाने केली.