सिल्लोड - सोयगाव मतदार संघातील रस्त्यांची कामे प्रगती पथावर
सिल्लोड/प्रतिनिधी - महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड - सोयगाव मतदार संघातील मंजूर रस्ते व पुलांची कामे प्रगती पथावर सुरू असून बरेचसे कामे पूर्ण झाली आहेत.
गेल्या दोन वर्षांच्या सत्ता काळात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री सडक योजना, लेखाशीर्ष 3054 अशा विविध योजनेतून मतदारसंघात रस्ते विकासासाठी जवळपास 200 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळवून दिली. तर आणखी जवळपास 300 कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेले असून यातील बरेचसे प्रस्तावांना या अर्थसंकल्पात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
रस्ते हे विकासाच्या वाहिन्या असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार नेहमी म्हणत असतात.त्यामुळे मतदारसंघात इतर विकास कामांसोबत रस्त्याची कामे देखील प्राधान्याने करण्यात येत आहे. मतदारसंघातील रस्त्यांची कामे गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व कार्यान्वित यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मतदारसंघात सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू असल्याचे दिसत आहेत.
मतदारसंघात रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. या अधिवेशनात आणखी काही प्रस्तावांना मंजुरी मिळेल. त्यामुळे ज्यांनी रस्त्यामध्ये अतिक्रमण केलेले आहेत त्यांनी स्वतः हून आपले अतिक्रमण काढून घ्यावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.