मराठा आंदोलकांवरील गुन्हे घेणार मागे
छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी - 31 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण, ज्या आंदोलनात आर्थिक नुकसान व जीवितहानी झालेली नाही, असे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. गृह विभागाने पोलिसांना त्यासंबंधीचे आदेश दिले असून ३१ जानेवारीपर्यंतच्या अशा गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून राज्यभर आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जालना, बीड अशा ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या. पण, मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यापासून ३१ जानेवारीपर्यंत अहिंसक गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. ज्या आंदोलनात आंदोलकांकडून कोणतेही आर्थिक व जीवितहानी झालेली नाही, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.
सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून अनेकांची महत्त्वाची कामे (वैद्यकीय, शैक्षणिक व इतर) 'रास्ता रोको'मुळे वेळेत होत नाहीत. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करताना कोणीही जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
'रास्ता रोको' प्रकरणी जिल्ह्यात २६ गुन्हे
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे, अनेक वाहनांमध्ये अत्यावश्यक माल असतो, काहीजण खासगी वाहनातून दवाखान्यात जात असतात, कोणाच्या मुलाचे प्रवेशाचे काम असते अशावेळी रास्ता रोको त्या सर्वसामान्य लोकांसाठी परवडणारा नसतो. त्यामुळे कोणीही सर्वसामान्य जनतेला अडचणी होतील असे कृत्य करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या 'रास्ता रोको'प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये २६ गुन्हे दाखल झाले आहेत.