शहागंज येथे २०० खाटांचे सुसज्ज महिला रुग्णालय उभारणार – खासदार इम्तियाज जलील
औरंगाबाद / प्रतिनिधी - खासदार इम्तियाज जलील यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद जनऔषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र शहागंज येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या २०० खाटांचे सुसज्ज महिला रुग्णालयाची गठीत रुग्णालय समितीसह स्थळ पाहणी करुन तात्काळ सविस्तर अहवाल व अंदाजपत्रक शासनस्तरावर प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच रुग्णालय उभारण्याकरिता जेवढा निधी लागेल तो मंजूर करुन आणणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेत दिनांक २५ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे झालेल्या आढावा बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद जनऔषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र शहागंज येथे गोरगरीब महिला रुग्णांना विविध आजारावर वेळेवर उपचार मिळावे व गरोदर महिलांची प्रसूती सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक होण्यास मदत व्हावी याकरिता अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती तसेच त्यासंबंधी लेखीपत्र सुध्दा वैद्यकीय मंत्री यांना देवून घाटीचे अधिष्ठाता वर्षा रोटे कागीनाळकर यांना प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे कळविले होते.
खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महिला रुग्णालय उभारण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अधिष्ठाता वर्षा रोटे कागीनाळकर यांनी २०० खाटांचे सुसज्ज महिला रुग्णालय सुरु करण्यासंबंधी पाच सदस्यीय समिती गठीत केली. डॉ.मोहन डोईबळे प्राध्यापक व विभागप्रमुख जनऔषध वैद्यकशास्त्र यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीत डॉ.श्रीनिवास गडप्पा (प्राध्यापक व विभागप्रमुख स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र), डॉ. सुधीर चौधरी (विशेष कार्य अधिकारी अतिविशेषोपचार रुग्णालय), इनचार्ज लिपिक (बांधकाम विभाग रुग्णालय) आणि श्री.एम.के. सैय्यद (विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद) यांचा समावेश आहे.
ही समिती नव्याने २०० खाटांचे सुसज्ज महिला रुग्णालय उभारण्याकरिता सद्यस्थितीत असलेल्या रुग्णालयाची तांत्रिक पाहणी, बांधकाम, वैद्यकीय पदे, यंत्रसामुग्री, वैद्यकीय उपकरणे आणि सर्व सोयीसुविधेसह सविस्तर अहवाल व अंदाजपत्रक तयार करुन प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणार आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी बैठकीत पुढील प्रमाणे मुद्दे उपस्थित केले होते
औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अनेक आरोग्य केंद्रातून विविध आजाराने ग्रस्त व गरोदर महिलांना उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) औरंगाबाद येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात रेफर करण्याचे प्रमाण चिंताजणक आहे, क्षमतेपेक्षा जास्त महिला उपचाराकरिता भरती होत असल्यामुळे फ्लोअरबेडची वेळ रुग्णांवर येते. वर्षभर कोणत्याही परिस्थितीत तज्ञ डॉक्टरांचा चमू आपत्कालीन रुग्णसेवा देतात परंतु क्षमतेपेक्षा जास्त महिला रुग्ण असल्यामुळे डॉक्टर, रुग्ण व नातेवाइकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागतो. शहराच्या मध्यभागी शहागंज येथे अद्यावत स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालय उभारल्यास घाटीच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात येणारे अधिकचे ताण तर कमी होणारच तसेच विविध आजारानेग्रस्त व प्रसूतीकरिता येणारे गरोदर महिलांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यास मदत होईल. सबब ठिकाणी अद्यावत रुग्णालय बांधकामाकरिता जागा असुन, प्रवासासाठी विविध वाहने सुध्दा उपलब्ध असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते.