आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेला अन्
औरंगाबाद /प्रतिनिधी - मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे गेट नंबर ५६ आणि झेंडा चौकाच्या दरम्यान प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार दोन जण गप्पा मारीत रेल्वेच्या रुळावर बसलेले होते. सचखंड एक्सप्रेसने त्या दोघांनाही उडविले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका व्यक्तीच्या दाव्यानुसार दोघांपैकी एक जण आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही मृत्यू झाला. मुकुंदवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन मिरधे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेस गाडीच्या समोर आलेल्या दोघांच्या धडकेत चिंधड्या उडाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.
शिवाजी नारायण गिरी ( ५०, रा. न्यू एस.टी. कॉलनी) आणि बबन साहेबराव हाडे (५९, रा. राजनगर, मुकुंदवाडी) अशी मृतांची नावे असल्याचे मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी सांगितले.
त्यांनी मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने टू माेबाइल व्हॅनमध्ये टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद मुकुंदवाडी ठाण्यात करण्यात आली. मात्र हा अपघात की आत्महत्या; हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. अधिक तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहेत.