बसला आग लागल्याने १७ जणांचा होरपळून मृत्यू

कराची :पाकिस्तानच्या सिंध जिल्ह्यात बुधवारी एका बसला भीषण आग लागून बसमधील १७ जणांचा मृत्यू झाला. ही घटना कराचीपासून ९० किमी अंतरावर असलेल्या नूरियाबाद शहरात घडली. अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक घटनेचा व्हिडीओ  समोर आला आहे. 

पाक अधिकार्‍यांनी या घटनेला दुजोरा दिला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी नुरियााबादजवळील महामार्गावर खैरपूर नाथन शाह भागात जाणाऱ्या बसला आग लागल्याने तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला. तर २० हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले.

पाकिस्तानी मीडियानुसार, कराची शहराअंतर्गत सुरू असलेली बस ५० हून अधिक पूरग्रस्तांना घेऊन जात होती, हे पुरग्रस्त कराचीमध्ये तात्पुरत्या आश्रयस्थानात राहत होते. खैरपूर नाथन शाहच्या दिशेने ही बस जात असताना या बसला नूरियााबादजवळ  आग लागली.

अचानक बसला आग लागल्याने बसमधील काही प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. उर्वरित प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. या दुर्घटनेत १७ प्रवाशी होरपळले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पाकिस्तानी पोलिसांनी सांगितले.

सिंध संसदीय आरोग्य सचिव कासिम सौमरो यांनी अपघातातील मृतांच्या संख्येची पुष्टी करताना सांगितले की, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले १२ प्रवासी अल्पवयीन असून त्यांचे वय 15 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे. बसमधील सर्व प्रवासी खैरपूर नाथन शाह या एकाच गावातील रहिवासी होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा