टूल बॉक्स मधून येत होती दुर्गंधी उघडताच दिसले भयानक दृश्य

टूल बॉक्स मधून येत होती दुर्गंधी  उघडताच दिसले भयानक दृश्य

संभाजीनगर /प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगरलगत जाणाऱ्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील झाल्टा परिसरात उभ्या ट्रकमध्ये आज, बुधवार पहाटे ५ वाजता मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता चालकाच्या सीट मागील टुलबॉक्समध्ये अहिल्यानगर येथील केडगावमधील ट्रक चालक-मालक असलेले विजय मुरलीधर राऊत (५२) यांचा मृतदेह आढळून आला.

 
मागील तीस वर्षांपासून राऊत ट्रक व्यवसायात आहेत. चालक ठेवण्याऐवजी ते स्वत:च ट्रक चालवून मालाची नेआण करत. सहा दिवसांपूर्वी ते मध्यप्रदेशच्या रायपुर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये माल पोहोचवण्यासाठी एकटेच गेले होते. तेथून त्यांना अहिल्यानगरसाठी लोखंडी सळया पोहोचवण्याचे कंत्राट मिळाले. त्यामुळे रविवारी ते तेथून माल घेऊन निघाले. मंगळवारी मध्यरात्री मात्र त्यांच्या संघटनेच्या एका ट्रक चालकाला राऊत यांचा ट्रक (एम एच १७ - बीडी - ५१६६) छत्रपती संभाजीनगरलगत जाणाऱ्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील झाल्टा परिसरात उभा दिसला. त्याने गावाकडील अन्य संघटनेच्या सदस्यांना तत्काळ ही बाब कळवली. संघटनेच्या सदस्यांनी शहरातील काही ट्रक व्यवसायिकांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. ते मध्यरात्री २ वाजता आडगाव परिसरात पोहोचले. ट्रकमधून मात्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. चालकाच्या कॅबिनमधूनच दुर्गंधी येत असल्याने त्यांनी टुलबॉक्स उघडला. तेव्हा टुलबॉक्समध्ये राऊत यांच्या चेहऱ्यावर क्रुर पध्दतीने वार करुन हत्या केलेला फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने सर्वांना धक्काच बसला. 

राऊत यांची हत्या नेमकी कुठे झाली, हे अद्यापही स्पष्ट आहे. मारेकऱ्याने त्यांची दुसरीकडे हत्या केली असावी. त्यानंतर टुलबॉक्समध्ये मृतदेह लपवून ट्रक झाल्टा परिसरात आणून उभा केल्याचा दाट संशय आहे. जिल्ह्याचे उपअधीक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतिष वाघ, चिकलठाण्याचे उपनिरीक्षक सतिष पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दुपारपर्यंत घाटी रुग्णालयात राऊत यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा