मी माणसे जोडली अन माणुसकीची जोड दिली - प्रा. सुरेश पुरी यांची कृतज्ञता
औरंगाबाद, दि. 26 प्रतिनिधी : माझ्या आयुष्यात मी असंख्य विद्यार्थी घडविले. ती कृतज्ञता सर्वांनी आयुष्यभर जपली आहे. हेच माझे कुटुंब आहे. सर्व क्षेत्रात माझे विद्यार्थी आज स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. जनसंपर्काचा मूळ हेतूच माणसे एकमेकांशी जोडणे आहे. मी त्याला माणुसकीची जोड दिली. ते आयुष्याचे संचित माझ्याच मातीतील सन्मानाने मला मिळाले आहे. उदगीर तालुका पत्रकार संघाचा हा पुरस्कार माझ्या विविध क्षेत्रांत नाव कमावलेल्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो, अशी कृतज्ञता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख तथा हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री प्रा. सुरेश पुरी यांनी व्यक्त केली.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रा. सुरेश पुरी यांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रा. पुरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, बसवराज पाटील नागराळकर यांची उपस्थिती होती.यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीरला माहिती विभागाचे उप माहिती कार्यालय व पत्रकार भवन लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे यांनी केले.
या कार्यक्रमात शोध व उत्कृष्ट वार्ता गटातील शंकर बिराजदार,हणमंत केंद्रे,बापू नाईकवाडे, अविनाश काळे, विनोद गुरमे,ज्योतिराम पांढरपोटे या मराठवाड्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात काम केलेल्या कोरोना योद्धे यांचा सत्कारही राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. शिवशंकर पटवारी ,प्रवीण मेंगशेट्टी,बसवराज पाटील नागराळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.पुरी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन प्रा. प्रवीण जाहुरे यांनी केले. कार्यक्रमास औरंगाबादचे माहिती सहायक डॉ.श्याम टरके, महावितरणचे सेवा निवृत्त जनसंपर्क अधिकारी शिवाजी इंद्राळे, सेवानिवृत्त प्रा. डॉ. नागनाथ कुंटे, लातूर जिल्हा परिषदेचे सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी , गोव्याच्या रजनी नाईक -धानुरे, राजीव धानुरे,नारायण गोस्वामी, विठ्ठल कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पत्रकार व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले. आभार दयानंद बिरादार यांनी मानले.